Reading Time: 3 minutes
Income Tax Information

Table of Contents

बऱ्याच जणांना वेतनवाढ किंवा बोनस मिळाल्यावर खूप आनंद होतो. पण जेव्हा त्या उत्पन्नावर कर भरावा लागेल हे समजते, तेव्हा तो आनंद काही वेळातच मावळतो. प्राप्तिकराचे आजही अनेकांना ओझे वाटते. प्राप्तिकर काय असतो?, तो कोणाला भरावा लागतो?, किती भरावा लागतो?, प्राप्तिकर केव्हापासून लागू झाला?, त्याचे वर्गीकरण कसे करण्यात येते?, त्या प्राप्तिकराचे काय करण्यात येते? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत. ती माहिती जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे समाविष्ट केले आहेत.

 

१.प्राप्तिकर म्हणजे काय?

कोणत्याही उत्पन्नावरील कर म्हणजे प्राप्तिकर.. हा विशिष्ट बाबींपासून निर्माण झालेल्या प्राप्तीवर व एकंदर प्राप्तीवर आकारतात. प्राप्तिकर हा प्रत्यक्ष कर आहे. कारण ह्या करामध्ये कर देणाऱ्याला त्याचा भार हा विक्री कराराप्रमाणे दुसऱ्यावर टाकता येत नाही. 

 

२.प्राप्तिकराची आकारणी करायला केव्हापासून सुरुवात झाली?

सन १७७६ मध्ये ॲडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने करप्रणालीबद्दल काही तत्वे सांगितली होती. त्यामध्ये करदात्याच्या आर्थिक क्षमतेप्रमाणे कर आकारण्यात यावा, करभरणा सोप्या व सुटसुटीत पद्धतीने करण्यात यावी, करपद्धती क्लिष्ट नसावी व त्यात सारखे बदल करण्यात येऊ नयेत, करसंकलन करण्यासाठी लागणारी किंमत ही गोळा होणाऱ्या कराच्या तुलनेत परवडणारी असावी या तत्वांचा समावेश होता. 

 

भारतात इंग्रजांनी सन १८६० मध्ये सर्वप्रथम प्राप्तिकराची आकारणी सुरू केली. सन १९२२ मध्ये कायद्यात बदल करून प्राप्तिकर खाते अस्तित्वात आणले. स्वतंत्र भारताने सन १९६१ पासून प्राप्तिकर कायदा लागू केला, जो आजतागायत लागू आहे. या कायद्यामध्ये प्राप्तिकराविषयीचे विविध नियम नमूद केले आहेत.

 

३.प्राप्तिकर हा कोणास बंधनकारक आहे?

• यंदाचे आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ज्या व्यक्तीचे उत्पन्न हे रुपये २,५०,००० पर्यंत असेल, तर त्या व्यक्तीला कोणताही कर भरावा लागणार नाही. ज्या व्यक्तीचे उत्पन्न हे रुपये २,५०,००१ ते ५,००,००० च्या दरम्यान असेल, त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर ५% या दराने कर आकारण्यात येईल व त्या व्यक्तीला सेक्शन ८७अ नुसार कर सूट देखील उपलब्ध आहे. ज्या व्यक्तीचे उत्पन्न हे रुपये ५,००,००१ ते ७,५०,००० च्या दरम्यान असेल, त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर १०% या दराने, तर ज्या व्यक्तीचे उत्पन्न रुपये ७,५०,००१ ते १०,००,००० च्या दरम्यान असेल, त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर १५%, ज्या व्यक्तीचे उत्पन्न रुपये १०,००,००१ ते १२,५०,००० च्या दरम्यान असेल, त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर २०%, ज्या व्यक्तीचे उत्पन्न रुपये १२,५०,००१ ते १५,००,००० च्या दरम्यान असेल, त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर २५% आणि ज्या व्यक्तीचे उत्पन्न हे रुपये १५,००,००० पेक्षा जास्त असेल, त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर ३०% या दराने कर आकरण्यात येईल. 

 

• कलम १३९(१) मधील सातव्या तरतुदीनुसार वर्षभरात करदात्याने एक किंवा अधिक वीजजोडांवर आलेल्या सर्व वीज देयकांवर मिळून एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली असल्यास विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. 

 

• वर्षभरात एक किंवा अधिक चालू खात्यांमध्ये एकत्रितरीत्या एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम कोणत्याही मार्गाने सहकारी बॅंकेसह कोणत्याही बँकेत भरली असल्यास 

 

• कोणत्याही साधारण निवासी करदात्याची परदेशात मालमत्ता असल्यास किंवा कोणत्याही परदेशी संस्थेत हितसंबंध असल्यास किंवा परदेशात असलेले बँक खाते चालविण्याचा वा सही करण्याचा अधिकार असल्यास, करदात्याचे भारतात कोणतेही उत्पन्न नसले तरीही..

 

• वर्षभरात जर परदेशवारीवर दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असल्यास.. यामध्ये शेजारील देश व धार्मिक कारणासाठी झालेला प्रवास समाविष्ट नाही. 

 

४.प्राप्तिकर हा किती भरावा लागतो किंवा त्याचा दर काय?

प्राप्तिकर हा प्रत्येकाला त्याच्या उत्पन्नाप्रमाणे आणि वरील दिलेल्या कोणत्याही मुद्द्यामध्ये तो बसत असल्यास त्याप्रमाणे तो भरावा लागतो. शिवाय प्राप्तिकराचा दर हा देखील व्यक्तीच्या उत्पन्नावर अवलंबून असतो. त्याबद्दल अधिक माहिती ही वरील मुद्द्यामध्ये दिलेली आहे. 

 

५.प्राप्तिकराचे वर्गीकरण कसे करण्यात येते?

प्राप्तिकराचे खाली दिलेल्या पाच प्रकारात वर्गीकरण केले आहे.

५.१.वेतनाचे उत्पन्न

५.२.घरभाड्यातून मिळणारे उत्पन्न

५.३.व्यवसायाचे उत्पन्न

५.४.भांडवली नफा

५.५.इतर उत्पन्न

 

करप्रणालीत जास्त उत्पन्न कमावणारी व्यक्ती जास्त दराने कर देण्यास सक्षम असते असे मानले गेले आहे. तसेच कमी उत्पन्न गटाला प्राप्तिकर अजिबात भरावा लागत नाही. याशिवाय कर वाचवण्यासाठी विविध वजावटी कायद्यात दिलेल्या आहेत. यामध्ये करदात्यांना गुंतवणूकीस प्रोत्साहन देणे, विमा भविष्यनिर्वाह सुनिश्चित करणे अशा गोष्टींचा सहभाग आहे. ज्यांना प्रत्यक्ष कर भरावा लागत नाही, त्यांना वस्तू आणि सेवा विकत घेताना वस्तू आणि सेवा कर विकत घ्यावा लागतो. अश्या रीतीने गरीबातील गरीब देखील आपल्या परीने देशाच्या उत्पन्नात भर टाकत असतो. 

 

६.प्राप्तिकराचे पुढे काय करण्यात येते?

जसे कौटुंबिक खर्चासाठी लागणाऱ्या पैशांची गरज कुटूंबातील कमावत्या व्यक्तीकडून भागवली जाते. त्याचप्रमाणे सरकारला लागणारा पैसा कर स्वरूपाने नागरिकांकडून गोळा केला जातो. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर हा सरकारच्या उत्पन्नाचा मोठा भाग आहे. 

 

देशाचे संरक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा,आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबवण्यात येणारे लोककल्याणकारी प्रकल्प या सर्वांसाठी वित्तपुरवठा हा आपल्या कराच्या पैशातूनच होत असतो. 

 

७.प्राप्तिकराबद्दल अधिक माहिती

गेल्या २५ वर्षात भारतात प्राप्तिकराच्या दरात लक्षणीय घट करण्यात आली आहे. तसेच करमुक्त उत्पन्नाची रक्कम ही वाढवण्यात आली आहे. संगणकीकरणाचा आणि बँकिंग सुविधेचा योग्य तो उपयोग करून करभरणा व करविवरण पत्र सादरीकरण अतिशय सोपे व सुटसुटीत करण्यात आलेले आहे. या सगळ्यामुळे करसंकलनात गेल्या काही वर्षात चांगली वाढ झालेली आहे. 

 

प्राप्तिकर खात्याची भीती आता नष्ट होऊन करभरणा करण्याची प्रवृत्ती आता वाढत चालली आहे. हे सगळे असले तरीही कराची चोरी होताना पाहायला मिळते. मोठ्या आर्थिक व्यवहारांवर पॅन आणि आधार जोडणीमुळे प्राप्तिकर खात्याची नजर आहे. असे आर्थिक व्यवहार विवरणपत्रात न दाखवल्यास करदात्यांना सुचनापत्रे देऊन विचारणा करणे सुरू झाले आहे. 

 

देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी करस्वरूपाने केलेल्या मदतीतून देश मजबूत होणार आहे, हे लक्षात ठेवून प्रत्येकाने आपले करदायित्व ओळखून कर भरायला हवा. 

 

fill & click submit
to whatsapp us